Mothers Last Call - आईचा शेवटचा फोन
आई आणि लेकीच्या प्रेमाचा भावनिक संवाद मांडणारी ही कथा. Mother’s Last Call – आईचा शेवटचा फोन”. या प्रेमाचा निरपराध शेवट नक्की वाचा.
आई आणि लेकीच्या प्रेमळ नात्याचा गोडवा
अनिता :- इंदू, अगं ए इंदू फोन उचल गं! कधीचा वाजतोय, बघ कोणाचं तरी महत्वाचं काम असेल.
इंदू :- राहूदे, मरूदे गरज असेल तर करेल परत फोन. चल आपली मिटिंग लागली आहे, नाहीतर उशीर होईल.
अनिता :- अगं हो पण.. बरं बाई चल. रोजचंच आहे ते मिटींग्स वगैरे, पण तरीही चल.
असं बोलून दोघी पण मिटिंग रूम मध्ये निघून गेल्या. वेळ सकाळी अकरा वाजताची होती. मिटिंग संपेपर्यंत जेमतेम अडीच वाजले असतील.
असो, दोघी पण दुपारच्या जेवणाच्या गडबडीत होत्या म्हणून त्यांनी थेट लंच रूम मध्ये स्वारी वळवली.
अर्धा तास निवांत दुपारच्या भोजनाचा आस्वाद घेतला आणि मग दोघी फेरफटका मारण्यासाठी ऑफिस च्या बाल्कनीमध्ये आल्या.
अनिता :- अगं इंदू, तुझ्या आईच्या हातची कारल्याची भाजी खूपच छान झाली होती.
आईला सांग की मला आवडली आणि पुढल्या वेळेस माझ्यासाठी वेगळा डबा भरून द्यायला सांग.
इंदू :- अगं माहित आहे मला, तिच्या हातची कारल्याची भाजी खूपच छान होते. म्हणून तर बाबा तिच्यावर आमच्यापेक्षा जास्त प्रेम करतात.
असो चला, वेळ झाली मिटींग्स मधले पॉईंट्स नोट करून त्यावर काम करावं लागेल. त्यात ही दिवाळी पण कशी पटकन आली.
अनिता :- अगं हो ना गं बाई, अवघे १० दिवसच उरले आहेत. तुझं काय तुला आयता फराळ भेटेल करून, मला तसं नाही भेटणार ना. माझी आई तर गावाला असते.
इंदू :- अगं मग दिवाळी पहाट ला थेट माझ्या घरीच ये की!
अनिता :- तसं नाही गं मी आपलं ते असंच म्हंटल.
इंदू :- हरकत नाही रे, तू ये माझ्या आईच्या हातचा चिवडा पण चाखून बघ एकदा. भले भले फेल आहेत.
अनिता :- बरं बाई आवरत घ्या आई पुराण. कामावर थोडं लक्ष द्या.
इंदू :- अगं हो काय ते किती रुल्स, कंटाळा आला बाई.
जबाबदारीची ओढाताण -
असो, कामात दोघींचा ही चांगलाच वेळ निघून गेला. संध्याकाळच्या चहाची वेळ झाली. वेळ असेल जेमतेम सव्वाचार च्या आसपास.
तेव्हा इंदू ला तिच्या मोबाईल ची आठवण झाली, आणि ती मोबाईल उचलणार एवढ्यात टीम लीडर ने परत मिटिंग साठी बोलावणं धाडलं.
इंदू आणि अनिता पुन्हा मिटिंग रूम मध्ये गेल्या त्या थेट संध्याकाळी निघायच्या वेळेस म्हणजे सात च्या सुमारास बाहेर आल्या. तेव्हा घरी निघायची घाई होती.
असो, दोघी एकाच सोसायटी मध्ये राहत असल्याने प्रवासात एकमेकींना चांगलीच साथ होती.
बस पकडल्यानंतर अलगद इंदू ने मोबाईल चेक केला आणि तिला एकदम गहिवरून आलं.
जीव गहिवरून कासावीस करणारा हा क्षण -
अनिता थोडीशी थबकली, हिला अचानक काय झालं? इंदू फक्त हुंदके देत होती, काय झालं काहीच समजत नव्हतं. घरच अंतर अगदी दोन मिनिटांवर होत.
बस थांबली, इंदू बस मधून उतरून थेट धावत घराच्या दिशेने गेली, मागोमाग अनिता देखील आली. 
सर्व सोसायटी मधली माणसं जमली होती. गेटवर लाल दिव्याची गाडी (Ambulance) उभी होती.
“तेजस” इंदूचा भाऊ त्या लाल दिव्याच्या गाडीत बसून होता. इंदूची नजर एकसारखी त्या लाल दिव्याच्या गाडीकडे होती.
अखेर गाडीचा दरवाजा उघडला आणि इंदूने मोठ्याने हंबरडा फोडला. त्या गाडीतून एक ‘शव’ बाहेर येत होते आणि ते शव म्हणजे इंदूची आई….
वेळेची खरी किंमत आणि नात्यातला दुरावा -
दुपारी वाजत असलेला फोन जर वेळीच उचलला गेला असता तर निदान आईची आणि इंदूची अखेरची भेट घडली असती.
पण नियती आहे ती, तिचा खेळ हा कधीच कोणाला कळत नाही.
सोबत अनिता सुद्धा रडत होती. धीर देण्यासाठी इंदूची काकी इंदूजवळ आली.
इंदूने काकीला विचारणा केली असता, काकीने सांगितलं की दुपारी, आई च्या छातीत दुखत होत.
तेजस ला फोन केला तर तो कॉलेजमध्ये वेबिनार मध्ये बिझी होता.
तुला कैक वेळ फोन केले पण तू ही उचलायला तयार नाहीस.
तुझे बाबा कामानिमित्त सकाळीच पुण्यासाठी रवाना झालेले. त्यांना अर्ध्या वाटेवरून बोलावून घेतलं, ते येतंच असतील.
संध्याकाळी साडेआठ च्या दरम्यान बाबा परत आले, आणि इंदूने आणखी ओकसून हंबरडा फोडला.
बाबा… हे काय झालं? का हा खेळ देवाने केला. कोणाचं काय वाईट केलं होत?
आईचा शेवटचा आवाज ही माझ्या नशिबी का नाही आला?
बाबा स्वतः स्तब्ध आणि निःशब्द होते. तरीही लेकीचा आक्रोश ऐकून थोडे हळवे झाले होते, पण बापाचं काळीज ते कठोर तर राहावंच लागत.
त्यांनी इंदू ला आईचा आशीर्वाद घेण्यास सांगितलं, आणि ते ही त्या शवाच्या पाया पडले. इंदूच्या आईची अखेरची स्वारी निघाली.
आठवणींना उजाळा -
सौभाग्याने नटलेला तो साज ज्याची टिंगल एकेकाळी आई जिवंत असताना इंदू करायची तो डोळ्यासमोर आला.
पण वेळ गेलेली होती, पच्छाताप या शिवाय हातात काहीच शिल्लक राहील नव्हतं. योग्य वेळेत फोन उचलला गेला असता तर आई जिवंत असताना अखेरची मिठी झाली असती, अखेरचा आवाज ऐकता आला असता.
या स्पर्धेच्या युगात नियती आणि देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे? जर चुका जाणून होत असतील तर आपणच आपल्या नात्यात कुठे तरी कमी पडतो हे मात्र खरं.
दिवसातला १ मिनिट का होईना जर अनिता किंवा इंदू ने मोबाईल तपासला असता तर निदान आईचा जिवंतपणाचा शेवटचा स्पर्श तरी भेटला असता.
आता उरल्या त्या फक्त जर तर च्या गोष्टी. वेळ खूप आधीच निघून गेली होती. सर्व आवरून झालं होत. नातेवाईक घरच्या वाटेला परत चालले होते.
बाबा आणि तेजस अंतिम विधी उरकून घरी आले आणि एका कोपऱ्यात शांत बसून होते.
दोष देणार तर नक्की कोणाला? आणि का? या चुकीला चुकी म्हणून संबोधणार की नियतीचा नियोजित घेराव?
शिकवण -
कितीही महत्वाचं काम असेल तरी निदान दिवसातला १ मिनिट आपल्या हक्कांच्या माणसांसाठी द्या. त्यांच्यासाठीच आपण काम-धंदे, व्यवसाय करत असतो.
त्यांनाच जर द्यायला आपल्याकडे वेळ नसेल तर काय उपयोग. मेल्यावर गाव जेवण घालणे हा फक्त दिखावा आहे.
व्यक्ती प्रत्यक्ष जिवंत असताना तुम्ही किती दिवस सोबत जेवला ह्याच गणित कधी मांडलं आहे का?
एकत्र शेवटची सामूहिक कौटुंबिक बैठक कधी लागली होती?
याचा विचार कोणी केला आहे का ?

