Rebirth of Dreams पुनःर्जन्म स्वप्नांचा
तुम्ही आम्ही सर्वच मध्यमवर्गीय घरातील माणसे. उराशी अनेक स्वप्नांची पोटली पण हाताला ‘निराशेची किटली’ असा आपला व्यवहार. ह्या निराशेच्या किटलीतून कधीतरी आशावादी चहा चा सुगंध येईल आणि आपली स्वप्ने पूर्ण होतील ह्याची आपण वाट बघत असतो. Rebirth of Dreams – पुनर्जन्म स्वप्नांचा ही देखील अशीच काहीशी व्यथा मांडणारी कथा आपल्यासमोर सादर करीत आहोत.
वाट बघण्याच्या वेळेस सत्य परिस्थिती समोर असून सुद्धा आपण अनेकदा नजरचुक करून बसतो. आता ही नजरचुक का होते बरं? 
या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी ही कथा नक्की वाचा आणि आपल्या मित्रपरिवारामधे आवर्जून शेअर करा.
आत्मविश्वासाची कमतरता -
तर आपल्यातल्याच काहींना असे बोलताना आपण नेहमीच ऐकत असतो की – मी हे करेन, मी ते करेन, पण प्रत्यक्ष करायची वेळ असते तेव्हा तेच काहीजण बिथरतात.
स्वतःला नैराशेयच्या जाळ्यात ओढून घेतात, आणि सर्व काही गमावून बसतात. मुळात सर्वकाही म्हणजे महत्वाचा असतो तो आत्मविश्वास..
तो जर एकदा डगमगला की तुम्ही कितीही श्रीमंत व्हा, काहीच उपयोग होणार नाही.
असेच काहीसे माझ्या परिचयाच्या एका कुटुंबासोबत घडत होते. त्यांनी घडला प्रकार मला सांगितला.
त्यांचे कुटुंब म्हणजे एकंदरीत मुलगा, मुलगी, माझ्या परिचयात असलेले काका हे सर्वच प्रयत्न करत होते पण मनाची शांती त्यांना भेटत नव्हती.
मी सर्व परिस्थिती ऐकून घेतली.
आता मी कोणी मोठा ज्ञानी नाही की कोणता महापुरुष नाही की माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठ्या व्यक्तीला सल्ला देईन.
पण तरीही त्यांच्या बोलण्यातून काही तर्क मी बाजूला काढले आणि थेट मूळ समस्येवरचं घाव घालायचं ठरवलं.
तुलनात्मक जीवनाचा आधार -
त्यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट जाणवत होत की त्यांच्या मुलांची स्वप्न तर गगनचुंबी आहेत पण त्यांची तुलनात्मक माणसवृत्ती त्यांच्या यशामध्ये मोठा अडथळा निर्माण करीत आहे.
थोडं स्पष्टच बोलतो. त्यांच कुटुंब मध्यमवर्गीय, त्यामुळे त्यांचे विचार देखील अखुडतेच असणार.
मग त्यांना काही गोष्टी थेट समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, जसे की त्यांच्या बोलण्यात दुसऱ्याच्या परिस्थितीला आपली तुलना हे स्पष्ट दिसून येत होते.
देवावरच्या विश्वासाचे धरणं तर ओसंडून वाहत होते. (माझा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू मुळीच नाही.)
पण जर दिवसभर देव देव करून सर्व भेटलंच असत तर रामाला १४ वर्ष वनवासात काढावी लागलीच नसती. 
आणि त्यांच्या त्या मायावी शक्तीने त्यांनी तो वनवास लवकरच संपवला असता ना.
पण ज्या सृष्टीनिर्मात्याने देवांची पण जगण्यासाठीची परीक्षा घेतली तिथे तुम्ही आम्ही तर सामान्य माणसंच आहोत.
बरं हे झालं श्रद्धेचं. त्यांच्या म्हणण्यानुसार बाकीचे कुटुंब अफाट पैसे उधळतात, प्रत्येक सणावाराला खरेदी असते पण आमच्या कडे तोच रोजचा दिवस.
इथे ते आपली तुलना दुसऱ्यासोबत करतात. मग त्यांना समजावलं की, जिथे ते तुलना करत आहेत त्या कुटुंबाच्या मुळाची माहिती घ्या.
आज ही पिढी अफाट उधळण करते कारण अगोदरच्या पिढीने मन मारून जीवन जगले आहे.
त्यांना ते आयते ताट मिळाले आहे, पण तुम्ही तुमच्या संसाराचा डोलारा स्वतः उभा केला आहे.
आर्थिक नियोजनाची कमतरता -
जिथे जिथे तुम्हाला अडलं तो मार्ग एक तर तुम्ही बदलला किंवा स्वतः निर्माण केला आणि उलट समोरच्यानी पिढीपार चालत आलेल्या संपत्तीतून तो विकत घेतला.
अश्या वेळेस काही गोष्टी योग्य मार्गाने होणे गरजेचे आहे. 
तुमची स्वप्न आहेत ना की तुमच्या मुलाने चारचाकीतून फिरावं मग घ्या की चारचाकी.
पण हे शौक पुरे करताना तुम्हाला आर्थिक नियोजन महत्वाचे आहे. 
तुम्ही इतरांसोबत जी स्वतःची तुलना करता ना ती स्वतःसोबत करा.
काल मी काय केलं आणि आज मी त्यात काय सुधारणा करतोय इथे लक्ष केंद्रित करा.
घरात ३ लोकांची इनकम येते पण तरीही मध्यमवर्गीय, याचा अर्थ एकचं तो म्हणजे आर्थिक नियोजनाची कमतरता.
होऊद्या ना खर्च एकदाच. मेलेल्या स्वप्नांना द्या की पुनःर्जन्म!
फार फार तर काय होईल एक वेळ जेवणाचे वांदे होतील, मग होऊद्या की.
कारण स्वप्नांना पुनःर्जन्म द्यायचा म्हणजे आयुष्याला नवे वळण घ्यावे लागणार, आणि तिथे अडचणी तर येणारच. पण त्यातही काही जण संधी निर्माण करतात.
स्वप्नांना पुनःर्जन्म देऊन जे हवं ते मिळवण्यासाठी काही महत्वाचे नियम आहे ज्याचं पालन केलं की तुमची स्वप्ने फक्त जन्मालाच नाही येणार तर पूर्ण देखील होतील.
आत्मविश्वासाचे पुनरागमन आणि नियोजन -
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास.
त्यानंतर जे स्वप्न पूर्ण करायचं आहे त्याबद्दल संपूर्ण माहितीचे आकलन, जसे की – जर तुम्हाला गाडी घायची आहे तर त्या क्षेत्राबद्दल मूलभूत माहिती तरी तुम्हाला असणे गरजेचे आहे.
त्यानंतर तुमचे आर्थिक नियोजन. जो पैसा विनाकारण खर्च होतोय त्याला कारणीभूत मार्गी लावा.
मन देखील शांत आणि खऱ्या किमतीला योग्य जागा मिळेल. सर्वात महत्वाचे म्हणजे नैराश्याच्या विचारांच्या धरणाचे दरवाजे हे तुम्हाला स्वतःच बंद करावे लागतील.
तेव्हा कुठे तुमच्या आत्मविश्वासाचा झरा योग्य प्रवाहाने वाहू लागेल.
आयुष्यात अडचणी सर्वांना असतात तरीही आपण निदान दोन वेळच अन्न पोटभर जेवतो.
पण खऱ्या आयुष्याचा सारांश पाहायचा असेल तर कधी तरी वेळ काढून मोठमोठ्या ब्रिज खाली जाऊन साडीच्या फाटक्या पदराआड मांडलेला संसार आणि त्यातले ते हसरे चेहरे पहा.
त्यांना उद्या जेवायला भेटेल की नाही याची माहिती नसताना सुद्धा ते आज आनंदी जगतात, उलट आपण उद्या मला भेटूदे यासाठी आज जेवत नाही.
आणि दुर्दैवाने आपल्यातलेच काही जण उद्याच जेवण जेवण्याआधीच डोळे मिटून घेतात. मला कसं आणि काय सांगायचंय हे समजलंच असेल.
काळजीपोटी मायेचा पाझर -
ब्रिजखालचे ते उघडे संसार पाहून कधीतरी काळजात होणारा रक्तप्रवाह अक्षरशा मॅरेथॉन खेळत असतो. 
आणि प्रश्नांच्या लाटा तर उसळी मारून मारून विचारांना घाबरवत असतात.
उद्या जर एखाद्या गाडीने त्या कठड्याला धडक दिली जिथे ते कुटुंब वास्तव्याला आहे तर त्यांचं काय होईल?
उद्याचा दिवस त्यांचा कसा असेल, मी जगतो तसा असेल का? मला अंगभर कपडे आहेत तर त्यांना पण भेटतील का ? असे अनेक प्रश्न भांबावून सोडतात.
म्हणूनच तुम्ही पाहिलेली स्वप्न वेळीच पूर्ण करा. 
स्वप्न पूर्ण करण्यासाठी जसे आर्थिक पाठबळ लागते तसेच स्वतःच्या आत्मविश्वासाचे पाठबळ देखील महत्वाचे असते.
समोरचा असा का आहे यापेक्षा मी तसा होऊ शकतो हे हे समजून घेतले की Rebirth of Dreams – पुनर्जन्म स्वप्नांचा नक्कीच साध्य होईल.

